
ब्ल्यू डायमंड आंतरप्रीनर्स क्लब व मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम; संविधानिक मूल्ये आणि सामाजिक वास्तवावर विद्यार्थ्यांशी संवाद
नागपूर, दि. १८ : ब्ल्यू डायमंड आंतरप्रीनर्स क्लब, नागपूर, शुद्धोधन कांबळे, डॉ. आशिष करोडे, डॉ. कमलेश मेश्राम मित्र परिवार आणि नेचर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तीन आदिवासी वसतिगृहांतील ११० विद्यार्थ्यांसाठी ‘जयंती 2’ या सामाजिक आशयाच्या चित्रपटाच्या मोफत शोचे आयोजन करण्यात आले. संगम Skylab टॉकीज येथे हा उपक्रम पार पडला.

तरुण विद्यार्थ्यांना सध्याच्या सामाजिक परिस्थितीची जाणीव व्हावी, संविधानिक मूल्ये समजावीत तसेच शिक्षण व्यवस्था, परीक्षा पद्धती, आरक्षण आणि समाजातील जातीय भेदभावासारख्या संवेदनशील विषयांकडे चिकित्सक दृष्टीने पाहता यावे, या उद्देशाने या विशेष शोचे आयोजन करण्यात आले होते.
‘जयंती 2’ चित्रपटातून मांडण्यात आलेल्या सामाजिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी चित्रपटाचा अनुभव घेतला. केवळ चित्रपट पाहणे एवढ्यापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता, त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. चित्रपटानंतर विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली तसेच उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला.
यावेळी ब्ल्यू डायमंड आंतरप्रीनर्स क्लबचे अध्यक्ष राज गायकवाड, शुद्धोधन कांबळे, बादल श्रीरामे आणि निलेश सर यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधून मार्गदर्शन केले. संविधानिक मूल्यांची जपणूक, शिक्षणातून मिळणाऱ्या संधींचा योग्य उपयोग आणि सामाजिक प्रश्नांकडे डोळसपणे पाहण्याची गरज, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक जाणीव निर्माण करणारे उपक्रम सातत्याने राबविण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव समजून घेण्याची आणि त्यावर विचार करण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्लबचे सचिव विजय मस्के, सदस्य विक्रांत थुलकर, पूजा गायकवाड आणि निकिता सक्सेना यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या सांगता प्रसंगी क्लबचे सदस्य वैभव शहाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
























